श्रीमद्‌भगवद्‌गीता : सतरावा अध्याय (श्रद्धात्रयविभागयोग)  

Posted by Editor in

मूळ सतराव्या अध्यायाचा प्रारंभ

अथ सप्तदशोऽध्यायः
अर्थ
सतरावा अध्याय सुरु होतो.
मूळ श्लोक
अर्जुन उवाच
ये शास्त्रविधिमुत्सृज्य यजन्ते श्रद्धयान्विताः ।
तेषां निष्ठा तु का कृष्ण सत्त्वमाहो रजस्तमः ॥ १७-१ ॥
संदर्भित अन्वयार्थ
अर्जुन = अर्जुन, उवाच = म्हणाला, कृष्ण = हे श्रीकृष्णा, शास्त्रविधिम्‌ = शास्त्रविधीचा, उत्सृज्य = त्याग करून, ये = जी माणसे, श्रद्धया = श्रद्धेने, अन्विताः = युक्त होऊन, यजन्ते = देवादींचे पूजन करतात, तेषाम्‌ = त्यांची, निष्ठा = स्थिती, तु = तर, का = कोणती असते, सत्त्वम्‌ = सात्त्विकी असते, आहो = अथवा, रजः = राजसी, (किंवा) = किंवा, तमः = तामसी असते ॥ १७-१ ॥
अर्थ
अर्जुन म्हणाला, हे श्रीकृष्णा, जी माणसे शास्त्रविधीला सोडून श्रद्धेने युक्त होऊन देवादिकांचे पूजन करतात, त्यांची मग स्थिती कोणती? सात्त्विक, राजस की तामस? ॥ १७-१ ॥
मूळ श्लोक
श्रीभगवानुवाच
त्रिविधा भवति श्रद्धा देहिनां सा स्वभावजा ।
सात्त्विकी राजसी चैव तामसी चेति तां शृणु ॥ १७-२ ॥
संदर्भित अन्वयार्थ
श्रीभगवान = भगवान श्रीकृष्ण, उवाच = म्हणाले, देहिनाम्‌ = माणसांची, सा = ती (शास्त्रीय संस्कारांनी रहित अशी), स्वभावजा = स्वभावतःच उत्पन्न झालेली, श्रद्धा = श्रद्धा, सात्त्विकी = सात्त्विक, = आणि, राजसी = राजस, = तसेच, तामसी = तामस, इति = अशी, त्रिविधा एव = तीन प्रकारचीच, भवति = असते, ताम्‌ = ती, (मत्तः) = (माझ्याकडून), शृणु = तू ऐक ॥ १७-२ ॥
अर्थ
भगवान श्रीकृष्ण म्हणाले, मनुष्यांची ती शास्त्रीय संस्कार नसलेली, केवळ स्वभावतः उत्पन्न झालेली श्रद्धा सात्त्विक, राजस व तामस अशा तीन प्रकारचीच असते. ती तू माझ्याकडून ऐक. ॥ १७-२ ॥
मूळ श्लोक
सत्त्वानुरूपा सर्वस्य श्रद्धा भवति भारत ।
श्रद्धामयोऽयं पुरुषो यो यच्छ्रद्धः स एव सः ॥ १७-३ ॥
संदर्भित अन्वयार्थ
भारत = हे भारता (अर्थात भरतवंशी अर्जुना), सर्वस्य = सर्व माणसांची, श्रद्धा = श्रद्धा ही, सत्त्वानुरूपा = त्यांच्या अंतःकरणाच्या भावाला अनुरूप अशी, भवति = असते, अयम्‌ = हा, पुरुषः = पुरुष, श्रद्धामयः = श्रद्धामय आहे, (अतः) = म्हणून, यः = जो पुरुष, यच्छ्रद्धः = जशी श्रद्धा असणारा आहे, सः एव = तो स्वतःसुद्धा, सः = तोच असतो ॥ १७-३ ॥
अर्थ
हे भारता (अर्थात भरतवंशी अर्जुना), सर्व माणसांची श्रद्धा त्यांच्या अंतःकरणानुरूप असते. हा पुरुष श्रद्धामय आहे. म्हणून जो पुरुष ज्या श्रद्धेने युक्त आहे, तो स्वतःही तोच आहे (अर्थात त्या श्रद्धेनुसार त्याचे स्वरूप असते). ॥ १७-३ ॥
मूळ श्लोक
यजन्ते सात्त्विका देवान्यक्षरक्षांसि राजसाः ।
प्रेतान्भूतगणांश्चान्ये यजन्ते तामसा जनाः ॥ १७-४ ॥
संदर्भित अन्वयार्थ
सात्त्विकाः = सात्त्विक पुरुष, देवान्‌ = देवांची, यजन्ते = पूजा करतात, राजसाः = राजस पुरुष, यक्षरक्षांसि = यक्ष व राक्षस यांची (पूजा करतात), (तथा) = तसेच, अन्ये = अन्य जे, तामसाः = तामस, जनाः = पुरुष आहेत, (ते) = ते, प्रेतान्‌ = प्रेते, = आणि, भूतगणान्‌ = भूतगणांची, यजन्ते = पूजा करतात ॥ १७-४ ॥
अर्थ
सात्त्विक माणसे देवांची पूजा करतात. राजस माणसे यक्ष-राक्षसांची तसेच इतर तामस माणसे असतात, ती प्रेत व भूतगणांची पूजा करतात. ॥ १७-४ ॥
मूळ श्लोक
अशास्त्रविहितं घोरं तप्यन्ते ये तपो जनाः ।
दम्भाहङ्कारसंयुक्ताः कामरागबलान्विताः ॥ १७-५ ॥
संदर्भित अन्वयार्थ
अशास्त्रविहितम्‌ = शास्त्रविधीने रहित (केवळ मनःकल्पित), घोरम्‌ = घोर, तपः = तप, ये = जे, जनाः = पुरुष, तप्यन्ते = करतात, (च) = आणि, (ये) = जे पुरुष, दम्भाहङ्कारसंयुक्ताः = दंभ व अहंकार यांनी संयुक्त असतात, (एवम्‌) = तसेच, कामरागबलान्विताः = कामना, आसक्ती आणि सामर्थ्याचा अभिमान यांनी सुद्धा युक्त असतात ॥ १७-५ ॥
अर्थ
जी माणसे शास्त्रविधी सोडून केवळ मनाच्या कल्पनेप्रमाणे घोर तप करतात तसेच दंभ, अहंकार, कामना, आसक्ती आणि बळाचा अभिमान यांनी युक्त असतात ॥ १७-५ ॥
मूळ श्लोक
कर्शयन्तः शरीरस्थं भूतग्राममचेतसः ।
मां चैवान्तःशरीरस्थं तान्विद्ध्यासुरनिश्चयान्‌ ॥ १७-६ ॥
संदर्भित अन्वयार्थ
(च) = आणि, (ये) = जे पुरुष, शरीरस्थम्‌ = शरीररूपाने स्थित असणाऱ्या, भूतग्रामम्‌ = भूतसमुदायाला, = आणि, अन्तःशरीरस्थम्‌ = अंतःकरणात स्थित असणाऱ्या, माम्‌ = मज परमात्म्याला, एव = सुद्धा, कर्शन्तयः = कृश करणारे असतात, तान्‌ = ते, अचेतसः = अज्ञानी पुरुष, आसुरनिश्चयान्‌ = आसुर स्वभावाचे आहेत, (इति) = असे, विद्धि = तू जाण ॥ १७-६ ॥
अर्थ
जे शरीराच्या रूपात असलेल्या भूतसमुदायाला आणि अंतःकरणात राहणाऱ्या मलाही कृश करणारे असतात, ते अज्ञानी लोक आसुरी स्वभावाचे आहेत, असे तू जाण. ॥ १७-६ ॥
मूळ श्लोक
आहारस्त्वपि सर्वस्य त्रिविधो भवति प्रियः ।
यज्ञस्तपस्तथा दानं तेषां भेदमिमं शृणु ॥ १७-७ ॥
संदर्भित अन्वयार्थ
आहारः = भोजन, अपि = सुद्धा, सर्वस्य = सर्वांचे (आपल्या प्रकृतीला अनुसरून), त्रिविधः = तीन प्रकारचे, प्रियः = प्रिय, भवति = होते, तु = आणि, तथा = त्याचप्रमाणे, यज्ञः = यज्ञ, तपः = तप, (च) = आणि, दानम्‌ = दाने (ही सुद्धा तीन तीन प्रकारची होतात), तेषाम्‌ = त्यांचा, इमम्‌ = हा (वेगवेगळा), भेदम्‌ = भेद, (मत्तः) = माझ्याकडून, शृणु = तू ऐक ॥ १७-७ ॥
अर्थ
भोजनही सर्वांना आपापल्या प्रकृतीप्रमाणे तीन प्रकारचे प्रिय असते. आणि तसेच यज्ञ, तप व दानही तीन तीन प्रकारची आहेत. त्यांचे हे निरनिराळे भेद तू माझ्याकडून ऐक. ॥ १७-७ ॥
मूळ श्लोक
आयुःसत्त्वबलारोग्यसुखप्रीतिविवर्धनाः ।
रस्याः स्निग्धाः स्थिरा हृद्या आहाराः सात्त्विकप्रियाः ॥ १७-८ ॥
संदर्भित अन्वयार्थ
आयुःसत्त्वबलारोग्यसुखप्रीतिविवर्धनाः = आयुष्य, बुद्धी, बल, आरोग्य, सुख व प्रीती वाढविणारे, रस्याः = रसयुक्त, स्निग्धाः = स्निग्ध, स्थिराः = स्थिर राहणारे, (तथा) = तसेच, हृद्याः = स्वभावतःच मनाला प्रिय असणारे, (ईदृशाः) = असले, आहाराः = आहार म्हणजे भोजन करण्याचे पदार्थ, सात्त्विकप्रियाः = सात्त्विक पुरुषाला प्रिय असतात ॥ १७-८ ॥
अर्थ
आयुष्य, बुद्धी, बळ, आरोग्य, सुख आणि प्रीती वाढविणारे, रसयुक्त, स्निग्ध, स्थिर राहणारे, स्वभावतः मनाला प्रिय वाटणारे असे भोजनाचे पदार्थ सात्त्विक पुरुषांना प्रिय असतात. ॥ १७-८ ॥
मूळ श्लोक
कट्वम्ललवणात्युष्णतीक्ष्णरूक्षविदाहिनः ।
आहारा राजसस्येष्टा दुःखशोकामयप्रदाः ॥ १७-९ ॥
संदर्भित अन्वयार्थ
कटु = कडू, अम्ल = आंबट, लवण = खारट, अत्युष्ण = अतिशय गरम, तीक्ष्ण = तिखट, रुक्ष = कोरडे, विदाहिनः = दाहकारक (जळजळ निर्माण करणारे), दुःखशोक-आमयप्रदाः = दुःख, चिंता तसेच रोग उत्पन्न करणारे असे, आहाराः = आहार म्हणजे भोजन करण्याचे पदार्थ, राजसस्य = राजस पुरुषाला, इष्टाः = प्रिय असतात ॥ १७-९ ॥
अर्थ
कडू, आंबट, खारट, फार गरम, तिखट, कोरडे, जळजळणारे आणि दुःख, काळजी व रोग उत्पन्न करणारे भोजनाचे पदार्थ राजस माणसांना आवडतात. ॥ १७-९ ॥
मूळ श्लोक
यातयामं गतरसं पूति पर्युषितं च यत्‌ ।
उच्छिष्टमपि चामेध्यं भोजनं तामसप्रियम्‌ ॥ १७-१० ॥
संदर्भित अन्वयार्थ
यत्‌ = जे, भोजनम्‌ = भोजन, यातयामम्‌ = अर्धपक्व, गतरसम्‌ = रसरहित, पूति = दुर्गंधयुक्त, पर्युषितम्‌ = शिळे, = आणि, उच्छिष्टम्‌ = उष्टे आहे, = तसेच, (यत्‌) = जे, अमेध्यम्‌ अपि = अपवित्र सुद्धा आहे, (तत्‌) = ते भोजन, तामसप्रियम्‌ = तामस पुरुषाला प्रिय असते ॥ १७-१० ॥
अर्थ
जे भोजन कच्चे, रस नसलेले, दुर्गंध येणारे, शिळे आणि उष्टे असते, तसेच जे अपवित्रही असते, ते भोजन तामसी लोकांना आवडते. ॥ १७-१० ॥
मूळ श्लोक
अफलाकाङ्क्षिभिर्यज्ञो विधिदृष्टो य इज्यते ।
यष्टव्यमेवेति मनः समाधाय स सात्त्विकः ॥ १७-११ ॥
संदर्भित अन्वयार्थ
यः = जो, विधिदृष्टः = शास्त्रविधीने नियत, यज्ञः = यज्ञ, यष्टव्यम्‌ एव = करणे हे कर्तव्य आहे, इति = अशाप्रकारे, मनः = मनाचे, समाधाय = समाधान करून, अफलाकाङ्क्षिभिः = फळाची इच्छा न करणाऱ्या पुरुषांकडून, इज्यते = केला जातो, सः = तो, (यज्ञः) = यज्ञ, सात्त्विकः = सात्त्विक आहे ॥ १७-११ ॥
अर्थ
जो शास्त्रविधीने नेमून दिलेला, यज्ञ करणे कर्तव्य आहे, असे मनाचे समाधान करून फळाची इच्छा न करणाऱ्या पुरुषांकडून केला जातो, तो सात्त्विक यज्ञ होय. ॥ १७-११ ॥
मूळ श्लोक
अभिसन्धाय तु फलं दम्भार्थमपि चैव यत्‌ ।
इज्यते भरतश्रेष्ठ तं यज्ञं विद्धि राजसम्‌ ॥ १७-१२ ॥
संदर्भित अन्वयार्थ
तु = परंतु, भरतश्रेष्ठ = हे भरतश्रेष्ठा (अर्थात भरतवंशीयांमध्ये श्रेष्ठ अर्जुना), दम्भार्थम्‌ एव = केवळ दांभिक आचरणासाठी, = अथवा, फलम्‌ अपि = फळ हे सुद्धा, अभिसन्धाय = दृष्टीपुढे ठेवून, यत्‌ = जो यज्ञ, इज्यते = केला जातो, तम्‌ = त्या, यज्ञम्‌ = यज्ञाला, राजसम्‌ = राजस असे, विद्धि = तू जाण ॥ १७-१२ ॥
अर्थ
परंतु हे भरतश्रेष्ठा (अर्थात भरतवंशीयांमध्ये श्रेष्ठ अर्जुना), केवळ दिखाव्यासाठी किंवा फळही नजरेसमोर ठेवून जो यज्ञ केला जातो, तो यज्ञ तू राजस समज. ॥ १७-१२ ॥
मूळ श्लोक
विधिहीनमसृष्टान्नं मन्त्रहीनमदक्षिणम्‌ ।
श्रद्धाविरहितं यज्ञं तामसं परिचक्षते ॥ १७-१३ ॥
संदर्भित अन्वयार्थ
विधिहीनम्‌ = शास्त्रविधीने रहित, असृष्टान्नम्‌ = अन्नदानाने रहित, मन्त्रहीनम्‌ = मंत्र-रहित, अदक्षिणम्‌ = दक्षिणारहित, (च) = आणि, श्रद्धाविरहितम्‌ = श्रद्धेने रहित (अशाप्रकारे केल्या जाणाऱ्या), यज्ञम्‌ = यज्ञाला, तामसम्‌ = तामस यज्ञ, (इति) = असे, परिचक्षते = म्हणतात ॥ १७-१३ ॥
अर्थ
शास्त्राला सोडून, अन्नदान न करता, मंत्रांशिवाय, दक्षिणा न देता व श्रद्धा न ठेवता केल्या जाणाऱ्या यज्ञाला तामस यज्ञ असे म्हणतात. ॥ १७-१३ ॥
मूळ श्लोक
देवद्विजगुरुप्राज्ञपूजनं शौचमार्जवम्‌ ।
ब्रह्मचर्यमहिंसा च शारीरं तप उच्यते ॥ १७-१४ ॥
संदर्भित अन्वयार्थ
देवद्विजगुरुप्राज्ञपूजनम्‌ = देवता, ब्राह्मण, गुरू आणि ज्ञानी माणसांचे पूजन, शौचम्‌ = पवित्रता, आर्जवम्‌ = सरळपणा, ब्रह्मचर्यम्‌ = ब्रह्मचर्य, = आणि, अहिंसा = अहिंसा (हे सर्व), शारीरम्‌ = शरीरसंबंधी, तपः = तप (आहे), (इति) = असे, उच्यते = म्हटले जाते ॥ १७-१४ ॥
अर्थ
देव, ब्राह्मण, गुरू व ज्ञानी यांची पूजा करणे, पावित्र्य, सरळपणा, ब्रह्मचर्य आणि अहिंसा, हे शारीरिक तप म्हटले जाते. ॥ १७-१४ ॥
मूळ श्लोक
अनुद्वेगकरं वाक्यं सत्यं प्रियहितं च यत्‌ ।
स्वाध्यायाभ्यसनं चैव वाङ्मयं तप उच्यते ॥ १७-१५ ॥
संदर्भित अन्वयार्थ
अनुद्वेगकरम्‌ = उद्वेग निर्माण न करणारे, प्रियहितम्‌ = प्रिय आणि हितकारक, = तसेच, सत्यम्‌ = यथार्थ सत्य असे, यत्‌ = जे, वाक्यम्‌ = भाषण आहे, = तसेच, (यत्‌) = जो, स्वाध्यायाभ्यसनम्‌ = वेदशास्त्रांचे पठण तसेच परमेश्वराच्या नावाच्या जपाचा अभ्यास, (तत्‌) एव = तेच, वाङ्मयम्‌ = वाचेसंबंधीचे, तपः = तप, (इति) = असे, उच्यते = सांगितले जाते ॥ १७-१५ ॥
अर्थ
जे दुसऱ्याला न बोचणारे, प्रिय, हितकारक आणि यथार्थ भाषण असते ते, तसेच वेदशास्त्रांचे पठण व परमेश्वराच्या नामजपाचा अभ्यास, हेच वाणीचे तप म्हटले जाते. ॥ १७-१५ ॥
मूळ श्लोक
मनःप्रसादः सौम्यत्वं मौनमात्मविनिग्रहः ।
भावसंशुद्धिरित्येतत्तपो मानसमुच्यते ॥ १७-१६ ॥
संदर्भित अन्वयार्थ
मनःप्रसादः = मनाची प्रसन्नता, सौम्यत्वम्‌ = शांत भाव, मौनम्‌ = भगवंतांचे चिंतन करण्याचा स्वभाव, आत्मविनिग्रहः = मनाचा निग्रह, (च) = आणि, भावसंशुद्धिः = अंतःकरणाच्या भावांची चांगल्याप्रकारे पवित्रता, इति = अशाप्रकारे, एतत्‌ = हे, मानसम्‌ = मनासंबंधीचे, तपः = तप, उच्यते = म्हटले जाते ॥ १७-१६ ॥
अर्थ
मनाची प्रसन्नता, शांत भाव, भगवच्चिंतन करण्याचा स्वभाव, मनाचा निग्रह आणि अंतःकरणातील भावांची पूर्ण पवित्रता, हे मनाचे तप म्हटले जाते. ॥ १७-१६ ॥
मूळ श्लोक
श्रद्धया परया तप्तं तपस्तत्त्रिविधं नरैः ।
अफलाकाङ्क्षिभिर्युक्तैः सात्त्विकं परिचक्षते ॥ १७-१७ ॥
संदर्भित अन्वयार्थ
अफलाकाङ्क्षिभिः = फळाची इच्छा नसणाऱ्या, युक्तैः = योगी, नरैः = पुरुषांकडून, परया = परम, श्रद्धया = श्रद्धेने, तप्तम्‌ = केले गेलेले, तत्‌ = जे (पूर्वोक्त), त्रिविधम्‌ = तीन प्रकारचे, तपः = तप (त्याला), सात्त्विकम्‌ = सात्त्विक, परिचक्षते = असे म्हणतात ॥ १७-१७ ॥
अर्थ
फळाची इच्छा न करणाऱ्या योगी पुरुषांकडून अत्यंत श्रद्धेने केलेल्या वर सांगितलेल्या तिन्ही प्रकारच्या तपाला सात्त्विक तप म्हणतात. ॥ १७-१७ ॥
मूळ श्लोक
सत्कारमानपूजार्थं तपो दम्भेन चैव यत्‌ ।
क्रियते तदिह प्रोक्तं राजसं चलमध्रुवम्‌ ॥ १७-१८ ॥
संदर्भित अन्वयार्थ
यत्‌ = जे, तपः = तप हे, सत्कारमानपूजार्थम्‌ = सत्कार, मान आणि पूजा यांच्यासाठी केले जाते, (तथा) = तसेच, च एव = अन्य कोणत्यातरी स्वार्थासाठी स्वभावतः केले जाते, (वा) = किंवा, दम्भेन = दांभिकपणाने, क्रियते = केले जाते, तत्‌ = ते, अध्रुवम्‌ = अनिश्चित, (तथा) = तसेच, चलम्‌ = क्षणिक फळ देणारे तप, इह = येथे, राजसम्‌ = राजस असे, प्रोक्तम्‌ = म्हटले गेले आहे ॥ १७-१८ ॥
अर्थ
जे तप सत्कार, मान व पूजा होण्यासाठी तसेच दुसऱ्या काही स्वार्थासाठीही स्वभावाप्रमाणे किंवा पाखंडीपणाने केले जाते, ते अनिश्चित तसेच क्षणिक फळ देणारे तप येथे राजस असे म्हटले आहे. ॥ १७-१८ ॥
मूळ श्लोक
मूढग्राहेणात्मनो यत्पीडया क्रियते तपः ।
परस्योत्सादनार्थं वा तत्तामसमुदाहृतम्‌ ॥ १७-१९ ॥
संदर्भित अन्वयार्थ
मूढग्राहेण = मूढतापूर्वक हट्टाने, आत्मनः = मन, वाणी व शरीर यांच्या, पीडया = पीडेसहित, वा = अथवा, परस्य = दुसऱ्याचे, उत्सादनार्थम्‌ = अनिष्ट करण्यासाठी, यत्‌ = जे, तपः = तप, क्रियते = केले जाते, तत्‌ = त्या तपाला, तामसम्‌ = तामस असे, उदाहृतम्‌ = म्हटले जाते ॥ १७-१९ ॥
अर्थ
जे तप मूर्खतापूर्वक हट्टाने, मन, वाणी आणि शरीर यांना कष्ट देऊन किंवा दुसऱ्यांचे अनिष्ट करण्यासाठी केले जाते, ते तप तामस म्हटले गेले आहे. ॥ १७-१९ ॥
मूळ श्लोक
दातव्यमिति यद्दानं दीयतेऽनुपकारिणे ।
देशे काले च पात्रे च तद्दानं सात्त्विकं स्मृतम्‌ ॥ १७-२० ॥
संदर्भित अन्वयार्थ
दातव्यम्‌ = दान देणे हे कर्तव्य आहे, इति = अशा भावनेने, यत्‌ = जे, दानम्‌ = दान, देशे = देश, = तसेच, काले = काल, = आणि, पात्रे = पात्र प्राप्त झाल्यावर, अनुपकारिणे = उपकार न करणाऱ्याला, दीयते = दिले जाते, तत्‌ = ते, दानम्‌ = दान, सात्त्विकम्‌ = सात्त्विक असे, स्मृतम्‌ = म्हटले गेले आहे ॥ १७-२० ॥
अर्थ
दान देणे कर्तव्य आहे, या भावनेने जे दान, देश, काल आणि पात्र मिळाली असता उपकार न करणाऱ्याला दिले जाते, ते दान सात्त्विक म्हटले गेले आहे. ॥ १७-२० ॥
मूळ श्लोक
यत्तु प्रत्युपकारार्थं फलमुद्दिश्य वा पुनः ।
दीयते च परिक्लिष्टं तद्दानं राजसं स्मृतम्‌ ॥ १७-२१ ॥
संदर्भित अन्वयार्थ
तु = परंतु, यत्‌ = जे, (दानम्‌) = दान, परिक्लिष्टम्‌ = क्लेशपूर्वक, = तसेच, प्रत्युपकारार्थम्‌ = प्रत्युपकाराच्या अपेक्षेने, वा = अथवा, फलम्‌ = (कोणतेतरी) फळ, उद्दिश्य = दृष्टीपुढे ठेवून, पुनः = पुन्हा, दीयते = दिले जाते, तत्‌ = ते, दानम्‌ = दान, राजसम्‌ = राजस, (इति) = असे, स्मृतम्‌ = म्हटले आहे ॥ १७-२१ ॥
अर्थ
परंतु जे दान क्लेशपूर्वक, प्रत्युपकाराच्या हेतूने अथवा फळ नजरेसमोर ठेवून दिले जाते, ते दान राजस म्हटले आहे. ॥ १७-२१ ॥
मूळ श्लोक
अदेशकाले यद्दानमपात्रेभ्यश्च दीयते ।
असत्कृतमवज्ञातं तत्तामसमुदाहृतम्‌ ॥ १७-२२ ॥
संदर्भित अन्वयार्थ
यत्‌ = जे, दानम्‌ = दान, असत्कृतम्‌ = सत्कार न करता, (वा) = अथवा, अवज्ञातम्‌ = तिरस्कार करून, अदेशकाले = अयोग्य स्थळी व काळी, = तसेच, अपात्रेभ्यः = कुपात्र माणसाला, दीयते = दिले जाते, तत्‌ = ते, (दानम्‌) = दान, तामसम्‌ = तामस, उदाहृतम्‌ = म्हटले गेले आहे ॥ १७-२२ ॥
अर्थ
जे दान सत्काराशिवाय किंवा तिरस्कारपूर्वक अयोग्य ठिकाणी, अयोग्य काळी आणि कुपात्री दिले जाते, ते दान तामस म्हटले गेले आहे. ॥ १७-२२ ॥
मूळ श्लोक
ॐ तत्सदिति निर्देशो ब्रह्मणस्त्रिविधः स्मृतः ।
ब्राह्मणास्तेन वेदाश्च यज्ञाश्च विहिताः पुरा ॥ १७-२३ ॥
संदर्भित अन्वयार्थ
= ॐ, तत्‌ = तत्‌, सत्‌ = सत्‌, इति = हे, त्रिविधः = तीन प्रकारचे, निर्देश: = नाम, ब्रह्मणः स्मृतः = सच्चिदानंदघन ब्रह्माचेच आहे, तेन = त्याच्याकडून, पुरा = सृष्टीच्या आदिकाळी, ब्राह्मणाः = ब्राह्मण, = आणि, वेदाः = वेद, = तसेच, यज्ञाः = यज्ञ इत्यादी, विहिताः = निर्मिले गेले ॥ १७-२३ ॥
अर्थ
ॐ तत्‌ सत्‌ अशी तीन प्रकारची सच्चिदानंदघन ब्रह्माची नावे सांगितली आहेत. त्यांपासून सृष्टीच्या आरंभी ब्राह्मण, वेद आणि यज्ञादी रचले गेले आहेत. ॥ १७-२३ ॥
मूळ श्लोक
तस्मादोमित्युदाहृत्य यज्ञदानतपःक्रियाः ।
प्रवर्तन्ते विधानोक्ताः सततं ब्रह्मवादिनाम्‌ ॥ १७-२४ ॥
संदर्भित अन्वयार्थ
तस्मात्‌ = म्हणून, ब्रह्मवादिनाम्‌ = वेदमंत्रांचे उच्चारण करणाऱ्या श्रेष्ठ पुरुषांच्या, विधानोक्ताः = शास्त्रविधीने नियत अशा, यज्ञदानतपःक्रियाः = यज्ञ, दान आणि तपरूप क्रिया या, सततम्‌ = सदा, = ॐ, इति = असे (परमात्म्याचा नामाचे), उदाहृत्य (एव) = उच्चारण करूनच, प्रवर्तन्ते = सुरू होतात ॥ १७-२४ ॥
अर्थ
म्हणून वेदमंत्रांचा उच्चार करणाऱ्या श्रेष्ठ पुरुषांच्या शास्त्राने सांगितलेल्या यज्ञ, दान व तप रूप क्रियांचा नेहमी ॐ या परमात्म्याच्या नावाचा उच्चार करूनच आरंभ होत असतो. ॥ १७-२४ ॥
मूळ श्लोक
तदित्यनभिसन्धाय फलं यज्ञतपःक्रियाः ।
दानक्रियाश्च विविधाः क्रियन्ते मोक्षकाङ्क्षिभिः ॥ १७-२५ ॥
संदर्भित अन्वयार्थ
तत्‌ = तत्‌ म्हणजे तत्‌ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या परमात्म्याचे हे सर्व काही आहे, इति = या भावनेने, फलम्‌ = फळाची, अनभिसन्धाय = इच्छा न धरता, विविधाः = नाना प्रकारच्या, यज्ञतपःक्रियाः = यज्ञ व तप रूप क्रिया, = तसेच, दानक्रियाः = दानरूप क्रिया, मोक्षकाङ्क्षिभिः = कल्याणाची इच्छा करणाऱ्या पुरुषांकडून, क्रियन्ते = केल्या जातात ॥ १७-२५ ॥
अर्थ
तत्‌ या नावाने संबोधिल्या जाणाऱ्या परमात्म्याचेच हे सर्व आहे, या भावनेने फळाची इच्छा न करता नाना प्रकारच्या यज्ञ, तप व दान रूप क्रिया कल्याणाची इच्छा करणाऱ्या पुरुषांकडून केल्या जातात. ॥ १७-२५ ॥
मूळ श्लोक
सद्भावे साधुभावे च सदित्येतत्प्रयुज्यते ।
प्रशस्ते कर्मणि तथा सच्छब्दः पार्थ युज्यते ॥ १७-२६ ॥
संदर्भित अन्वयार्थ
सद्भावे = सत्य भावाच्या बाबतीत, = आणि, साधुभावे = श्रेष्ठ भावांच्या संदर्भात, सत्‌ = सत्‌, इति = या प्रकारे, एतत्‌ = या परमात्म्याच्या नावाचा, प्रयुज्यते = प्रयोग केला जातो, तथा = तसेच, पार्थ = हे पार्था (अर्थात पृथापुत्र अर्जुना), प्रशस्ते = उत्तम, कर्मणि (अपि) = कर्माच्या बाबतीत सुद्धा, सत्‌ = सत्‌ या, शब्दः = शब्दाचा, युज्यते = प्रयोग केला जातो ॥ १७-२६ ॥
अर्थ
सत्‌ या परमात्म्याच्या नावाचा सत्य भावात आणि श्रेष्ठ भावात प्रयोग केला जातो. तसेच हे पार्था (अर्थात पृथापुत्र अर्जुना), उत्तम कर्मातही सत्‌ शब्द योजला जातो. ॥ १७-२६ ॥
मूळ श्लोक
यज्ञे तपसि दाने च स्थितिः सदिति चोच्यते ।
कर्म चैव तदर्थीयं सदित्येवाभिधीयते ॥ १७-२७ ॥
संदर्भित अन्वयार्थ
= तसेच, यज्ञे = यज्ञ, तपसि = तप, = आणि, दाने = दान यांच्या बाबतीत, (या) = जी, स्थितिः = स्थिती म्हणजे श्रद्धा व आस्तिक भाव आहे, (सा) एव = ती सुद्धा, सत्‌ = सत्‌, इति = याप्रकाराने, उच्यते = सांगितली जाते, = आणि, तदर्थीयम्‌ = त्या परमात्म्यासाठी केले जाणारे, कर्म = कर्म हे, एव = निश्चितपणे, सत्‌ = सत्‌, इति = असे, अभिधीयते = म्हटले जाते ॥ १७-२७ ॥
अर्थ
तसेच यज्ञ, तप आणि दान यांमध्ये जी स्थिती अर्थात आस्तिक बुद्धी असते, तिलाही सत्‌ असे म्हणतात आणि त्या परमात्म्यासाठी केलेले कर्म निश्चयाने सत्‌ असे म्हटले जाते. ॥ १७-२७ ॥
मूळ श्लोक
अश्रद्धया हुतं दत्तं तपस्तप्तं कृतं च यत्‌ ।
असदित्युच्यते पार्थ न च तत्प्रेत्य नो इह ॥ १७-२८ ॥
संदर्भित अन्वयार्थ
पार्थ = हे पार्था (अर्थात पृथापुत्र अर्जुना), अश्रद्धया = श्रद्धेविना केले जाणारे, हुतम्‌ = हवन, दत्तम्‌ = दिलेले दान, (च) = तसेच, तप्तं तपः = केलेले तप, = आणि, यत्‌ = जे काहीही, कृतम्‌ = केले जाणारे शुभ कर्म आहे, (तत्‌) = ते सर्व, असत्‌ = असत्‌, इति = असे, उच्यते = सांगितले जाते, (अतः) = म्हणून, तत्‌ = ते तर, नो इह = या लोकीही लाभदायक नाही, = आणि, न प्रेत्य = मेल्यावरही लाभदायक नाही ॥ १७-२८ ॥
अर्थ
हे पार्था (अर्थात पृथापुत्र अर्जुना), श्रद्धेशिवाय केलेले हवन, दिलेले दान, केलेले तप आणि जे काही केलेले शुभ कार्य असेल, ते सर्व असत्‌ म्हटले जाते. त्यामुळे ते ना इहलोकात फलदायी होत ना परलोकात. ॥ १७-२८ ॥
मूळ सतराव्या अध्यायाची समाप्ती
ॐ तत्सदिति श्रीमद्‌भगवद्‌गीतासूपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे
श्रद्धात्रयविभागयोगो नाम सप्तदशोऽध्यायः ॥ १७ ॥
अर्थ
ॐ हे परमसत्य आहे. याप्रमाणे श्रीमद्‌भगवद्‌गीतारूपी उपनिषद तथा ब्रह्मविद्या आणि योगशास्त्राविषयी श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्या संवादातील श्रद्धात्रयविभागयोग नावाचा हा सतरावा अध्याय समाप्त झाला. ॥ १७ ॥

This entry was posted on Thursday, April 22, 2010 at 9:35 PM and is filed under . You can follow any responses to this entry through the comments feed .

0 comments

Post a Comment